नंदुरबार : मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच विज्ञान व गणित या विषयांची आवड निर्माण व्हावी, या हेतूने शासनामार्फत शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या विज्ञान केंद्रातील साहित्याचा वापर व त्यामागील वैज्ञानिक तत्व समजून घेण्याबाबत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांसाठी ‘नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र साहित्याचा वापर’ या विषयाबाबत दोनदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, डोंगरगाव येथील विज्ञान केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग प्राथमिक-माध्यमिक जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र असणाऱ्या विज्ञान शिक्षकांच्या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेला म्हसावद येथील कुबेर विद्यालयातील तज्ज्ञ मार्गदर्शक जितेंद्र शिंपी व तनेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले. विज्ञान केंद्रातील साहित्य व त्यामागील वैज्ञानिक तत्व स्पष्ट करताना त्यांनी विज्ञान व गणित विषयांमधील विविध संकल्पना साहित्याच्या वापरातून व प्रत्यक्ष कृतीतून शिक्षकांना समजावून दिल्या. विद्युत बेलचे कार्य, बर्नोलीचा चेंडू, पिसाचा झुलता मनोरा, तोल सांभाळणारी बाहुली, पायथागोरसचे प्रमेय, संख्यांचा शोध यासारखे जवळपास ५० साहित्य अभ्यासपूर्ण पद्धतीने समजावून दिले.
दोनदिवसीय कार्यशाळेत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र पुणे येथील विज्ञान विभागाच्या प्रमुख तेजस्विनी आळवेकर व मनिषा ताठे यांनी सहभागी होत कार्यशाळेच्या आयोजनाबाबत प्रशंसा केली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांच्या प्रेरणेतून ही कार्यशाळा झाली. उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी संवाद साधून जिल्ह्यात विज्ञान विषयात होत असलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले. संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता तथा विज्ञान विभागप्रमुख प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा ४० शिक्षकांनी लाभ घेतला. प्रशिक्षणार्थींमधून नवापूर तालुक्यातील कोळदे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राहुल साळुंके यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यशाळेविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेच्या संयोजिका व विज्ञान विषय सहाय्यक अलका अशोक पाटील यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.