लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुक्त जिल्हा अशी नवी ओळख नंदुरबारला मिळाली आहे़ या यशात आणखी भर पडली असून १० क्वारंटाईन कक्षांमधून तब्बल १ हजार २७ नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे़ याठिकाणी त्यांना उपचार देण्यासोबत त्यांची देखभालही करण्यात येत होते़प्रामुख्याने कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर क्वारंटाईन कक्षांमध्ये अनेकांची रवानगी होत होती़ कोरोनाची स्वॅब टेस्टचा अहवाल प्राप्त त्यांना आवश्यक त्या सूचना देऊन घरी रवाना करण्यात येत आहे़ या सर्व कक्षांसाठी एकूण ३११ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका आणि एमपीडब्ल्यू यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ यात नंदुरबार येथे ३१, नवापुर ६२, शहादा ३३, तळोदा ११३, अक्कलकुवा २४ तर धडगाव येथील कक्षात १८ अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या कक्षांमध्ये सध्या ठेवण्यात आलेल्या ११६ जणांची प्रकृती ही ठीक झाली असल्याने त्यांना लवकरच क्वारंटाईन कक्षांमधून घरी सोडले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान तळोदा (आमलाड) येथील विलगीकरण कक्ष हा सर्वाधिक मोठा आहे़ या कक्षात तब्बल ४० पेक्षा अधिक खोल्या असून येथे परराज्यातून आलेल्या मजूरांच्याही तपासण्या केल्या आल्या आहेत़क्वारंटाईन कक्षांतून जिल्ह्यातील विविध भागात सोडण्यात आलेल्या या नागरिकांची येत्या १५ दिवसात वेळोवेळी तपासणी करण्यावरही भर देण्यात येणार आहे़ यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण स्तरावर पथकांची नियुक्ती केली आहे़ ही पथके नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेत लक्षणे तपासणार आहेत़नंदुरबार येथे तीन, नवापुर येथे दोन, शहादा येथे दोन, तळोदा एक, अक्कलकुवा दोन तर धडगाव येथे एक असे १० क्वांटाईन सेंटर जिल्ह्यात आहेत़ ९२० बेडची क्षमता या कक्षांची आहे़ यात आतापर्यत १ हजार १४३ जणांना दाखल करण्यात आले होते़ पैकी १ हजार २७ जणांना घरी पाठवले गेले आहे़आतापर्यंत नंदुरबार येथील तीन कक्षांमधून २१६, नवापुर ४१०, शहादा येथील दोन कक्षातून १६६, तळोदा ९९, अक्कलकुवा ९० तर धडगाव येथील कक्षातून ४६ जण सोडण्यात आले आहेत़ जिल्ह्यात सर्व १० कक्ष कोरोनामुक्तीच्या लढ्यात सर्वाधिक महत्त्वपूर्ण साधने ठरली आहेत़क्वारंटाईन कक्षात दाखल झालेल्यांचे केवळ उपचार करण्यापेक्षा त्यांच्यातून कोरोनाची भिती घालवण्यावर भर दिली़ यामुळे अनेक जणांमधील नैराश्य दूर झाले आहे़ यामुळे डॉक्टर म्हणून समाधान मिळाले आहे़-डॉ़ महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, नंदुरबाऱ
एक हजार नागरिक क्वारंटाईनमधून मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:26 IST