लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील विविध भागात अपघातग्रस्तांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे प्रकार समोर आले आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात मात्र आजवर केवळ एकाच जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो कोरोनामुक्त झाला आहे़नवापूर तालुक्यातील एका ३० वर्षीय युवकाचा अपघात झाल्यानंतर गेल्या महिन्यात त्याला उपचारासाठी सुरत येथे दाखल करण्यात आले होते़ तेथे तीन दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ यानंतर परराज्यातून आला असल्याने रुग्णालय प्रशासनाने त्याचा स्वॅब अहवाल पडताळणीसाठी पाठवला होता़ तो पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर दुहेरी उपचार करण्यात आले़ यात कोरोनामुक्त झाल्यानंतर जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करुन त्याच्यावर उपचार करुन प्रकृती सुधारल्यावर घरी सोडण्यात आले़जिल्हा रुग्णालयात दरदिवशी १० ते १५ रुग्ण विविध कारणांसाठी दाखल होतात़ यात किरकोळ ते गंभीर अपघात आणि गर्भवती मातांची संख्या अधिक आहे़ यातील ९५ टक्के रुग्ण हे जिल्ह्यातील रहिवासी असल्याने त्यांचे स्वॅब घेण्याची कारवाई होत नाही़ परंतु एखाद्यात कोरोनासारखी लक्षणे असल्यास त्याचे स्वॅब मात्र घेतले जातात़ जिल्ह्याबाहेरुन किंवा राज्याबाहेरून आलेल्यांचे स्वॅब तपासणी करणे सक्तीचे केले गेले आहे़
जिल्हा रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त इतर वॉर्डात २०० रुग्ण दाखल आहेत़ यातील एखाद्या व्यक्तीत कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची तातडीने तपासणी करुन त्यांना तातडीने रुग्णालयाच्या कोविड कक्षात हलवण्यात येत आहे़ नवापूर तालुक्यातील अपघातीची केस वगळता इतर कोणत्याही दाखल झालेल्या रुग्णाचा अहवाल अद्याप पॉझिटिव्ह आलेला नाही़ असे असताना आरोग्य विभागाकडून दक्षता घेत बाहेर राज्यातून येणाऱ्या रुग्णांचे स्वॅब तपासले जात आहेत़