नंदुरबार: नवापूर तालुक्यात कुक्कुट पक्षांची मोठ्या प्रमाणत मरतूक आढळली असून 4 पोल्ट्री फार्ममधील 8 नमूना अहवाल एच-5एन-8 पॉझिटीव्ह आले असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी संसर्ग केंद्रापासून 1 किलोमीटरचे त्रिज्येतील क्षेत्र बाधित क्षेत्र आणि 10 किमी त्रिज्येतील क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.नवापूरमधील न्यू डायमंड पोल्ट्री फार्म, परवेझ पोल्ट्री फार्म, अरिफभाई पालवाला वासिम पोल्ट्री फार्म आणि मोहम्मदभाई अब्दुल सलाम आमलीवाला पोल्ट्री फार्म अशा चार पोल्ट्रीमधील नमुना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 31 हजार 833 कुक्कुट पक्षांचा मृत्यू झाला असून सुमारे 8 लाख 74 हजार 598 पक्षी नवापूर तालुक्यातील विविध पोल्ट्री फार्ममध्ये आहेत.बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षांची शास्त्रोक्त पद्धतीने कत्तल करावी आणि निगडीत अंडी, पक्षीखाद्य नष्ट करून त्याचीदेखील विल्हेवाटलावण्याचे निर्देश जलद कृती दलाला देण्यात आले आहेत. निगराणी क्षेत्रातील कुक्कुट पक्षी, अंडी व पक्षीखाद्य यांचे निगराणी क्षेत्राबाहेर वाहतूक, खरेदी-विक्री, तसेच बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास 90 दिवसापर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच 10 किमी त्रिज्येच्या परिसरातील गावे आवागमन प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.बाधित क्षेत्रातील कत्तल केलेले कुक्कुट पक्षी व नष्ट करण्यात आलेल्या कुक्कुट पक्षांची अंडी व पक्षी यांचा जागेवरच जलद कृती दलासमक्ष पंचनामा करण्यात येऊन त्वरीत अहवाल सादर करावा. नुकसान भरपाईसाठी अहवालाची पूर्ण खात्री करून शेतकरी व कुक्कुट व्यावसायिकांना नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची कार्यवाही विना विलंब करण्यात यावी. बाधित क्षेत्रात रिकामे करण्यात आलेले सर्व पक्षीगृहांचे आवश्यक जैवसुरक्षेसह 2 टक्के सोडियम हायपोक्लोरेट, पोटॅशिअम परमँगनेटद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.निगरणी क्षेत्राच्या ठिकाणी वाहनाच्या ये-जा करण्यास मनाई करण्यात यावी व त्या ठिकाणची खाजगी वाहने प्रसारीत क्षेत्राच्या बाहेर लावण्यात यावी. निगराणी क्षेत्रातील जिवंत अथवा मृत पक्षी, अंडी, कोंबडी खत, पशुखाद्य व अनुशंगीक साहित्य व उपकरणे यांच्या वाहतूकीस मनाई करण्यात यावी. व्यावसायिक पोल्ट्री फार्ममध्ये मालक व कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन कामकाज करावे. फार्म सोडतांना स्वत:चे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.निगराणी क्षेत्रात नगारिकांच्या हालचाली तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतूकीस नियंत्रित करण्यात यावे. निगराणी क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. उघड्यावर मृत पक्षी किंवा कोंबडी टाकू नये. तसेच त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांनी लावावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीची बैठकजिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पक्षी शास्त्रीय पद्धतीने कत्तल करणाऱ्या पथकांना औषधे, पीपीई कीट, मास्क तसेच आवश्यक साहित्य तात्काळ देण्यात यावे. त्यासाठी आरोग्य पथकाची नेमणूक करावी. नियंत्रण कक्षाची तातडीने सुरूवात करण्यात यावी. बाहेरून कुक्कुट पक्षी शहरात येणार नाही याची खबरदारी घ्यावी. पशुसंवर्धन विभागाने परिसरात बर्ड फ्लूबाबत जनजागृती करावी. पोल्ट्री कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सुचनेनुसार आवश्यक कालावधीसाठी विलगीकरणात ठेवण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.बैठकीला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते.
नवापूर येथील बर्ड फ्लू संसर्ग केंद्रापासूनचा एक किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 23:00 IST