भारतीय शिक्षण मंडळाचे देवगिरी प्रांताध्यक्ष प्राचार्य सर्जेराव ठोंबरे यांनी या वेबिनारचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील होते. राष्ट्रीय स्तरावरील शिक्षाविद् डॉ. सिरीपुरापू शंकर (आंध्र प्रदेश गुंजवाडा) व प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर (औरंगाबाद) यांनी दोन सत्रात २०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विवेचन करताना स्पष्ट केले की, भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय शिक्षण प्रणालीतील हा तिसरा मोठा बदल आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या शैक्षणिक धोरणाचे अंतिम उद्दिष्ट आहे. या धोरणात शालेय ते उच्चशिक्षणाच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. शिक्षण प्रकारांना शाखांच्या चौकटीतून बाहेर काढून आंतरशाखीय आणि समन्वयी करण्यात आले आहे. उच्चशिक्षण प्रणालीमध्ये व्यावसायिक शिक्षण हा अनिवार्य भाग असेल. तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान, विधि-कायदा, कृषी विद्यापीठे यांना आता बहुउद्देशीय संस्था बनविण्याचे उद्दिष्ट असणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये २१ व्या शतकासाठी आवश्यक कौशल्य निर्माण करण्यास महत्त्व दिले जाईल. अमेरिकेप्रमाणे भारतातही संशोधनाला महत्त्व देणे व त्याचा दर्जा सुधारण्यासाठी राष्ट्रीय संशोधन संस्था स्थापन करणे आणि देशाचा उच्चशिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे हेही उद्दिष्ट आहे. या धोरणांतर्गत उच्चशिक्षण संस्थांमध्ये साडेतीन कोटी नवीन जागा वाढविण्यात येतील. संशोधन आणि समुदाय प्रतिबद्धता शिक्षणाचा गाभा असेल. यात महाविद्यालयांची संलग्नता १५ वर्षांत टप्प्याटप्प्याने समाप्त केली जाणार आहे. अध्यापकांची नियुक्ती स्वतंत्र पारदर्शी पद्धतीने केली जाईल. मूलभूत निकषांप्रमाणे काम न करणाऱ्या अध्यापकांना जबाबदार ठरवले जाईल.
प्रास्ताविक उपप्राचार्य व नॅक को-ऑर्डिनेटर डॉ. एम. के. पाटील यांनी केले. समारोप प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनी केला. वेबिनारचे समन्वयक डॉ. विजयप्रकाश शर्मा, सूत्रसंचालन आयोजन समिती सदस्य डॉ. मिलिंद पाटील, डॉ. वजीह अशहर यांनी केले. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून एक हजार ८०० संख्येत प्रारंभापासून शेवटपर्यंत सहभागी प्राध्यापकांची पूर्ण उपस्थिती हे या वेबिनारचे वैशिष्ट्य ठरले. या आयोजनाच्या यशस्वीतेबद्दल संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, कबचौउमविचे कुलगुरू डॉ. ई. वायूनंदन, विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य दिलीप रामू पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, संस्थेच्या सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील व पी. आर. पाटील यांनी प्राचार्यांसह आयोजन समितीचे विशेष अभिनंदन केले.