लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आॅनलाईन आणि आॅफलाईन परीक्षांना सुरूवात झाली. नंदुरबार जिल्ह्यातील पाच तालुक्यात नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर १ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी आॅफलाईन आणि आॅनलाईन परीक्षेत सहभाग घेतला. दिवसभरात तीन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. सकाळी १० वाजेपासून या परीक्षांना सुरूवात झाली होती. अंतिम वर्ष बीए, बीएस्सी, बीकॉम, एमएस्सी, एमए आणि एमकॉम वर्गाच्या या परीक्षा होत्या. नंदुरबार शहरातील महिला महाविद्यालयात सर्व ११० विद्यार्थिनींनी आॅनलाईन पद्धतीने परीक्षा दिली. दुसरीकडे जीटी पाटील महाविद्यालयात ७५ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन तर ११० विद्यार्थ्यांनी आॅफलाईन पद्धतीने परीक्षा दिली. महाविद्यालयात बैठक व्यवस्था करण्यात आली होती. जिजामाता महाविद्यालयात ७२ विद्यार्थ्यांनी आॅफलाईन परीक्षा दिली. शहरातील हिरालाल चौधरी महाविद्यालयात ५२ विद्यार्थी आॅनलाईन होते. शहरातील चार ठिकाणी दिवसभरात ५५४ विद्यार्थ्यांनी आॅन आणि आॅफलाईन परीक्षा दिल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान सर्वच ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडल्याचे सांगण्यात आले असून कोरोनबाबत उपाययोजना केल्या होत्या. सर्व िठकाणी योग्य पद्धतीने सोयी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील तळोदा येथील कॉलेज संकुलात परीक्षा केंद्रावर सर्वाधिक ३५१ विद्यार्थी आॅफलाईन तर १५१ विद्यार्थी आॅनलाईन होते. अक्कलकुवा येथील वरिष्ठ महाविद्यालयात ९० विद्यार्थी आॅफलाईन तर १५ विद्यार्थी आॅनलाईन होते. शहादा येथील साने गुरूजी महाविद्यालयातील सर्वाधिक ५६० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन तर केवळ १० विद्यार्थ्यांनी आॅफलाईन पद्धतीने परीक्षा दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रांवर आॅफलाईन परीक्षा देणार्र्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र नियंत्रण व संपर्क कक्ष तयार केले गेले होते. सोबत कोरोना उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या.
परीक्षा सुरळीतपणे पार पडली आहे. नंदुरबार शहरातील सर्वच परीक्षा केंद्रांवर चांगली व्यवस्था होती. नेटही सुरू असल्याने विद्यार्थ्यांना स्मार्टफोनद्वारे परीक्षा देता आली. -डॉ. डी.एस.पाटील, प्राचार्य, महिला महाविद्यालय, नंदुरबार.