नंदुरबार : तालुक्यातील आष्टे येथे दोन महिन्यापासून जावयाकडे मुक्कामी असलेल्या ६८ वर्षीय वृद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील नटावद नंतर आता आष्टे येथे कोरोनाने धडक मारल्याने ग्रामिण भागातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी एकीकडे शहाद्यातील महिला कोरोनामुक्त झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत होते. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्तीची चर्चा सुरू असतांना सायंकाळी वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली. ही महिला मुळची बोरद, ता.तळोदा येथील असून दोन महिन्यांपासून आष्टे येथे आली आहे. सुरुवातीला उपचारासाठी ही महिला नंदुरबारातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर तेथील डॉक्टरने जिल्हा रुग्णालयात या महिलेला उपचारासाठी पाठविले होते. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने वृद्धेचे स्वॉब घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. वृद्धेची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे.
दरम्यान महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पथके आष्टे ता़ नंदुरबार आणि बोरद ता़ तळोदा येथे रवाना करण्यात आले आहेत़ आष्टे येथे महिलेवर उपचार करणारा डॉक्टर व वृद्ध महिलेचे कुटूंबिय यांची चौकशी सुरु होती़ वृद्धेचा नातू हा अहमदनगर येथून दीड महिन्यापूर्वी आल्याची माहिती समोर आली आहे़ बोरद येथे निवास नसल्याने त्याठिकाणी केवळ तपासणी होत आहे़ आष्टे येथे जिल्हा व तालुका आरोग्य विभागाचे पथक तैनात होत आहे़ तसेच नंदुरबार शहरातील दवाखान्यातही पडताळणी सुरु झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे़