लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा शिवारात तेल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.लिंगनघाट (नागपूर) येथून कपाशीचे कच्चे खाद्यतेल कढी (गुजरात) येथे टँकरने (क्रमांक जी.जे.१२ बी.व्ही.५८०४) वाहतूक करीत असताना बर्डीपाडा शिवारात टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर उलटून टाकी फुटल्याने टँकरमध्ये असलेले कपाशीचे कच्चे खाद्यतेल जमिनीवर वाहून गेले. टँकर चालक मंगाराम तकाराम जाट (२४) रा.बाडमेर (राजस्थान) हा जखमी झाला. त्याच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला. टँकरमधील सर्व तेल वाहून गेल्याने तेल व टँकरचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात ठेवलेल्या चाऱ्याचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने टँकर सरळ केला.
बर्डीपाडाजवळ तेलाचा टँकर उलटून अपघातात चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:58 IST