लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : १ लाख ६१ हजार हेक्टरवरच्या नंदुरबार वनक्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढल्याने हिंस्त्र प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे़ यातही वनक्षेत्रात अन्नसाखळी मजबूत झाल्याने येथून दुरावलेले ‘वाघा’सारखे वन्यजीव पुन्हा परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे़एखाद्या वनक्षेत्रात वाघ असणे म्हणजे ते सर्वसंपन्न वनक्षेत्र मानले जाते़ नंदुरबार जिल्ह्यात नवापुर तालुक्यात चरणमाळ घाटात १९९२ साली वाघ शेवटचा दिसला होता़ यानंतर जुलै २०१८ मध्ये ३५ वर्षानंतर वाघाची नोंद झाली़ गेल्या १० वर्षात झाडांची वाढती संख्या, थांबलेली वृक्षतोड, वाढणारे गवत तसेच उन्हाळ्यातही तग धरणारे नैसर्गिक पाणवठे यामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आहे़ यातूनच जिल्ह्यात वाघाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याचे आता स्पष्ट होत आहे़ नंदुरबार व नवापुरसह शहादा तालुक्यात गेल्या पाच वर्षात निलगाय, चितळ, हरीण, भेकर यासह मोरांची संख्या वाढली आहे़ यातून नंदुरबार आणि नवापुर तालुक्यात बिबट्यांची संख्या ही दोन आकडी झाली आहे़ सोबत कोल्हे, तरस यांचे कळप हिंडू लागल्याने वनक्षेत्रातील वन्यजीव संपदा वाढीस लागल्याचा अहवाल पुढे आला आहे़अहवालाला कोकणीपाडा ता़ नंदुरबार शिवारात दिसून आलेला पट्टेदार वाघ बळ देत असून हा वाघ किमान सहा महिने जिल्ह्यातील विविध भागात राहिला असावा असा अंदाज आहे़ गेल्याच महिन्यात याच वाघाचे अस्तित्त्व असल्याचा दनवापुर तालुक्यातून सुरु झाल्यानंतर वनविभागाने तपास सुरु केला होता़ यात वाघ दिसून आला नसला तरी नवापुर तालुक्यात १० पेक्षा अधिक बिबटे असल्याची माहिती समोर आली आहे़ नंदुरबार तालुक्यातही बिबट्यांची दोन आकडी झाली आहे़हरीणवर्गीय प्राणी वाढल्याने वाघासारखे हिंस्त्र प्राणी या भागात येत असावेत असा प्राथमिक अंदाज आहे़ नंदुरबार आणि नवापुर हे दोन तालुका वाघाच्या रहिवासासाठी ‘प्राईम’ लोकेशन असून याठिकाणी वाघाचा संचार आहे किंवा कसे याचा धांडोळा वनविभाग गेल्या वर्षभरापासून घेत आहे़ यातून अनेक शक्यता बळकट झाल्या आहेत़
नंदुरबार वनक्षेत्रात ‘वाघा’ला पोषक वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:03 IST