ब्राह्मणपुरी : तोरणमाळचे जंगल हे जैव विविधतेसाठी पोषक आहे. त्यामुळे या भागात विविध पशू, पक्षी आढळून येतात. अन्न साखळीही या भागात चांगली असल्याने आता अजगरही आढळून येत आहेत. अजगरापासून मानवाला धोका नसला, तरी पाळीव पशुंना मात्र त्यांचा धोका असतो. वन्य प्राणी आढळून आल्यास त्यांना धोका न पोहोचविता वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
तोरणमाळच्या जंगलात गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा अजगर आढळून आला आहे. दोन्ही वेळी त्याने शेळीला मारले आहे. शेळीचा आकार मोठा राहत असल्यामुळे त्याला ती गिळता येत नसल्याने, तो आपले भक्ष्य सोडून निघून जात आहे.
तोरणमाळच्या पठारावर सापांचा अधिवास चांगला आहे. सहज भक्ष्य मिळत असल्यामुळे त्यांची अन्नसाखळी टिकून आहे. त्यामुळे घाटातील आणि सपाटी भागातील सरपटणारे प्राणी आता पठाराकडे येत आहेत. त्यातीलच हे दोन उदाहरणे असल्याचे वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन खुणे यांनी सांगितले.
अजगर आढळून येत असल्यामुळे भीती जरी असली, तरी या भागात जैव विविधता टिकून असल्याचे उत्तम उदाहरण असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना त्रास न देता, न मारता त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहू देणे गरजेेचे आहे.