राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा हे अभियान सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ॲड. सीमा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात सहभागी ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी अंगणवाडीसेविका, रोजगार सेवक यांच्यासाठी जिल्हास्तरावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की ,अभियान यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच प्रत्येक शासकीय विभागाने पृथ्वी ,जल ,आकाश ,अग्नी, वायू या पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व विभागांनी वेळेत कृतिसंगम आराखडा तयार करून त्यांची अंमलबजावणी करावी अशा सूचना केल्या. माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा, लोणखेडा, वडाळी, बामखेडा, खेड दिगर, कल्साडी, पुरुषोत्तमनगर, ब्राह्मणपुरी अक्कलकुवा, राजमोही, मोठी नंदुरबार तालुक्यातील धानोरा, नवापूर तालुक्यातील खोकसा, तळवे, गणेश बुधावल तालुका तळोदा अशा एकूण १५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. वर्षा फडोळ, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, शहादा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी रणजित कुऱ्हे, जिल्हा कक्षातील युवराज सूर्यवंशी यांनी पंचतत्त्व व त्यांच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायत स्तरावर कोण कोणते उपक्रम राबविण्यात यावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायू या पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी व त्या अनुषंगाने काम करणेबाबत शपथ दिली.
कार्यशाळेस तालुकास्तरावरील विस्तार अधिकारी (पंचायत, कृषी), शाखा अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, लघुसिंचन ) मनरेगा विभागाचे तांत्रिक कर्मचारी जिल्हा स्तरावरील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. वर्षा फडोळ यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील पाटील यांनी केले.