कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शहरासह तालुक्यामधील ग्रामीण भागात फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून जनता कर्फ्यूमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तालुक्यात गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या वाढली आहे. त्यात अधिकाधिक रुग्ण होम क्वारंटाईन असून, आठ ते दहा रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत शहरासह तालुक्यात कोरोनाचा अटकाव असला तरी येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची भीती असून, आरोग्य विभागाने खबरदारी घेत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
अक्कलकुवा शहरासह खापर व मोलगीसारख्या गावांत जनता कर्फ्यूत भाजीपाला व किराणा दुकानांवर खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची आवश्यकता असून, तोंडाला मास्क लावणे गरजेचे असताना या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. स्वप्निल वानखेडे यांनी केले आहे. प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जनतेने लाॅकडाऊन काळात नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तरुणांनी विनाकारण फिरू नये तसेच सर्व दुकानदारांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे; अन्यथा यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी दिला आहे.