तळोदा : गेल्या महिना, दीड महिन्यापासून आजुबाजूच्या शेतशिवारात धूम ठोकणाऱ्या बिबट्याने शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चक्क शहरातील फॉरेस्ट नाक्याजवळील रस्त्यावर वाहनधारकांचा रस्ता अडविला होता. यावेळी तो जवळच असलेल्या नाल्याकडे गेल्यानंतर वाहनधारकांनी पुढे मार्गक्रमण केले. परंतु बंदोबस्ताबाबत वन विभागाने डोळ्यावर पट्टी बांधल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून तळोदा शहराला लागून असलेल्या आजुबाजूच्या शेतशिवारात बिबट्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गरीब रखवालदारांच्या झोपडीशेजारी बांधलेल्या शेळ्यांचा फडशा पाडला जात आहे. बिबट्याने तीन, चार दिवसांपूर्वी कुटिर रुग्णालयाजवळील आगवड्या शिवारातील रखवालदाराच्या शेळ्यांचा फडशा पाडला होता. साहजिकच त्याच्या दहशतीमुळे शेतकरी, शेतमजूर हा वर्ग चिंतातूर झाला आहे. शेतशिवारात वावरणाऱ्या या बिबट्याने चक्क शहरापासून फक्त ५०० ते ७०० मीटर अंतरावर असलेल्या गेटजवळील फॉरेस्ट चेक नाक्यावरच धूम ठोकली होती. अगदी साडेसात, पावणेआठची वेळ होती. या ठिकाणचा रस्ता ओलांडताना वाहनधारकांच्या नजरेस बिबट्या पडला होता. त्यामुळे दोन्हीकडेच्या वाहनधारकांनी वाहने उभी करून त्याची गंमत पाहिली होती. काहींनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिबट्याचा फोटोदेखील कैद केल्याचे म्हटले जात आहे. हा बिबट्या रस्त्यावरून फॉरेस्टकडे जाणाऱ्या नाल्याकडे गेल्यानंतर वाहनचालकांनी पुढे मार्गक्रमण केले. मात्र, आता बिबट्याचा वावर चक्क शहरातच सुरू झाल्याने नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. याच रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ पायी रपेट मारणाऱ्या नागरिकांचा मोठा वावर असतो. शिवाय याच रस्त्यावर वन विभागाचे जंगल आहे. हे जंगल पाच ते सहा एकरावर पसरले असून, निश्चितच बिबट्याला जागा असल्याने तेथे त्याचे वास्तव्य असल्याचा नागरिकांचा कयास आहे. नागरिकांची भीती लक्षात घेऊन वन विभागाच्या स्थानिक अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळ्यावरील पट्टी बाजूला सारून त्याच्या बंदोबस्ताबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.