२ जुलैपासून जिल्ह्यात महारक्तदान अभियान नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी लोकमतसह विविध, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्था यांच्या विद्यमाने शहरातील अग्रवाल भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवापूर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदवला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून रक्तदान होत नसल्याने राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. जूनपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून थांबलेल्या विविध आजारांवरील शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. राज्यभरात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्याने ती ओळखून ‘लोकमत’ने २ जुलैपासून ‘रक्ताचं नातं’ हे महारक्तदान अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.
लोकमत रक्ताचे नाते या रक्तदान शिबिरात नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी महेंद्र चव्हाण, जयेश सोनवणे, पल्लवी सोनवणे, लक्ष्मण धनगर, राजेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रीती गावीत, डॉ.सुनील गावीत, अर्चना भदाणे, कैलास माळी यांचे योगदान लाभले. शिबिरासाठी लोकमतचे तालुका प्रतिनिधी महेश पाटील, चिंचपाडा प्रतिनिधी राजू वसावे यांनी परिश्रम घेतले.