लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येणे सुरुच असून तब्बल सात रुग्ण धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आह़े धुळ्यासोबतच गुजरात राज्यात उपचारासाठी काही रुग्ण गेल्याने डेंग्यूसदृश तापाची साथ वाढत असल्याचे स्पष्ट होत आह़े शहरातील आंबेडकर चौक, बागवान गल्लीसह दाट लोकवस्तीच्या भागात डेंग्यू सदृश तापाचे पाच ते सात रुग्ण यापूर्वी आढळून आले होत़े त्यांना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होत़े रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर हिवताप विभागाकडून मंगळवारपासून तपासणी मोहिम सुरु आह़े शुक्रवारीही 9 संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासण्यात आल़े ते सर्व नमुने सामान्य असल्याची माहिती असून विभागाच्या पथकांनी 150 घरांचे सव्रेक्षण केले होत़े यातील निम्म्यापेक्षा अधिक घरांमध्ये साठा करुन ठेवलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळून आल्यानंतर पथकाने नमुने गोळा करत रासायनिक औषधी टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े यानंतरही साथ आटोक्यात नसल्याचे चित्र असून शहरातील सात रुग्ण हे धुळे येथे नव्याने दाखल झाल्याची माहिती शुक्रवारी समोर आली आह़े दरम्यान खाजगी रुग्णालयांमध्ये तापाच्या रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांना व्हायरलमुळे दाखल केल्याची माहिती समोर आली आह़े शहरात वाढत असलेल्या डेंग्यूच्या साथीवर नियत्रंण मिळवण्यासाठी पालिका व सेवा फाउंडेशनतर्फे ठिकठिकाणी धूरळणी सुरु आह़े दरम्यान शुक्रवारी सकाळी शहादा येथील साईबाबा नगरात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आह़े त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ नंदुरबार व शहाद्यात स्थिती गंभीर होत असताना नवापुरात मात्र साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत़ सफाईला वेग दिल्याने धोका टळल्याचे सांगण्यात आले आह़े
शहरात दर दिवशी रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हा रुग्णालयात कक्ष तयार केल्याची माहिती देण्यात आली आह़े परंतू या कक्षात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण अद्याप दाखल झालेले नाहीत़ यातच दोन दिवसांपूर्वी आढळून आलेली डेंग्यूसदृश तापाची संशयित रुग्ण ही जिल्हा रुग्णालयातील परिचारिका असल्याची माहिती समोर आली आह़े या परिचारिकेस डेंग्यूची लागण नेमकी कुठे झाली असावी याबाबत खुलासा नसला तरी रुग्णालय वसाहतीत साठलेल्या पाण्यात डासांची संख्या वाढल्याने तापाची लागण झाली असावी अंदाज आह़े