नंदुरबार : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी नंदुरबारात सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे़ सकाळी ११ वाजेपर्यंत नंदुरबारात २२ टक्के मतदान करण्यात आले़ दुपारी उन्हाचा पारा वाढत असल्याने सकाळी साडेसात वाजेपासूनच नागरिकांनी आपआपल्या भागातील मतदान केंद्रांवर येत मतदानाचा अधिकार बजावला़ दरम्यान, भाजपच्या उमेदवार डॉ़ हिना गावीत यांनी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नंदुरबारातील डी़आऱ हायस्कूल येथे आपला मतदानाचा हक्क बजावला़ तर कॉँग्रेसचे उमेदवार अॅड़ के़सी़ पाडवी यांनी आपल्या गावी असली ता़ अक्कलकुवा येथे मतदान केले़दरम्यान, मध्यप्रदेश व गुजरात येथे लागून असलेल्या सिमावर्ती भागातही ग्रामस्थांनी सकाळीच मतदान केंद्रावर जात मतदानाचा अधिकार बजावला होता़ अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या काठी येथील मतदान केंद्रावर ग्रामस्थांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्यात़ तर मध्यप्रदेशच्या सिमेवरील खेड दिगर केंद्रावर संपूर्ण गावच एकाच वेळी मतदानासाठी उलटल्याचे चित्र सकाळी निर्माण झालेले होते़दरम्यान, विविध केंद्रावर दिव्यांग बांधवांसाठी रॅमची व्यवस्था करण्यात आली होती़ तसेच अनेकांना सायकलसह विविध उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले होते़ त्यामुळे दिव्यांग बांधवांचाही मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग दिसून आला़ दुपारच्या उन्हाचा चटका टाळण्यासाठी नागरिकांची पावले सकाळीच मतदान केंद्राकडे वळताना दिसून येत होती़
नंदुरबारात सकाळी अकरापर्यंत २२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 11:36 IST