लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील चिखलीच्या निंबीपाडा-पाटीलपाडा ते आसनबारीपाडा या दरम्यान दोन किलोमीटरचा मातीचा रस्ता पावसामुळे चिखलमय झाल्याने वाहनधारकांचे वाहन या चिखलात अडकून जात असल्याने त्रासदायक ठरत आहे. या दोन किलोमीटर अंतराच्या मातीच्या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात आली आहे. हातपंपावरुन पाणी आणण्यासाठी महिलांनाही या रस्त्यावरील चिखल तुडवत ये-जा करावी लागते.अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या डोंगराळ भागातील चिखलीच्या निबीपाडा- पाटीलपाडा व आसनबारीपाडा या दरम्यान दोन किलोमीटर अंतराचा रस्ता मातीचा आहे. हा रस्ता कच्चा मातीचा असल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर सर्वत्र चिखल होतो. या चिखलात दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडत असल्याने वाहनधारकांचे मोठे हाल होतात. एक दुचाकी काढण्यासाठी चार ते पाच जणांना कसरत करावी लागते. दरवर्षी शाळकरी विद्यार्थ्यांचे या रस्त्यावरुन ये-जा करताना मोठे हाल होतात. यंदा मात्र कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे येणे-जाणे बंद आहे. शाळा सुरू असतात तेव्हा विद्यार्थ्यांनाही या चिखलातून मार्ग काढावा लागतो. लहान मुले चिखलात पडून त्यांचे शालेय साहित्यही खराब होते. पावसाळ्यात चार महिने या परिसरातील वाहनधारकांना या चिखलाच्या रस्त्यावरुनच वाहने न्यावी लागतात. हातपंपावरुन पाणी आणणाऱ्या या महिलांचेही हाल होतात.या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे खडीकरण करून डांबरीकरण करण्याची गरज आहे. संबंधित विभागाने दखल घेऊन हा रस्त्याचे पक्के बांधकाम करावे व पावसाळ्यात जनतेचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी आसनबारीपाडा, पाटीलपाडा व निंबीपाडा येथील नागरिकांनी केली आहे.निंबीपाडा, पाटीलपाडा व आसनबारीपाडा हा रस्ता मातीचा असल्याने पावसाळ्यात या चिखलमय रस्त्यावरुन वाहने काढताना खूपच फजिती होते. वाहनधारकांसह शाळकरी मुले व महिलांना पाणी आणण्यासाठी या चिखलातूनच मार्ग काढावा लागतो. त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर खडीकरण डांबरीकरणाचे काम होणे गरजेचे आहे.-सोन्या मुंगा वसावे, ग्रामस्थ, आसनबारीपाडा, ता.अक्कलकुवा.
मातीच्या रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:38 IST