लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : कडगाव ता. शिंदखेडा येथे दुचाकीने जाणा-याचा ट्राॅलाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. अपघात एकजण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. धुळे-सुरत महामार्गावरील हाॅटेल मानस जवळ ही घटना घडली. सूरत येथे व्यवसाय वास्तव्यास असणारे दीपक भीमसिंग गिरासे आणि देवसिंग कोमल गिरासे हे दोघेही जीजे, ०५ डी.एच २८०० या दुचाकीने शिंदखेडा तालुक्यातील कडगावकडे जाण्यासाठी सकाळी निघाले होते. दरम्यान नवापूर जवळ रा राष्ट्रीय महामार्गावर समोरुन ओव्हरटेक करणा-या सी.जे. ०४ एमसी ९१४६ या ट्राॅलाने त्यांना धडक दिली. धडकेत देवेसिंग गिरासे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक गिरासे यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर परिसरातील नागरीक मदतीला धावून आल्याने जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूरत येथे व्यवसाय वास्तव्यास असणारे दीपक गिरासे आणि देवसिंग कोमल गिरासे दिवाळीनिमित्त कडगाव येथे जात होते. अपघातातील जखमी दीपक गिरासे यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रॅाला चालक प्रदीपकुमार इंद्रदेव पंडीत रा. पूर्व सिंगभूम (झारखंड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी दिपक गिरासे याच्यावर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर देवसिंग गिरासे यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दिवाळीत नवापूर तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी दुपारी नवापुरहून देवदर्शनासाठी देवमोगरा येथे जात असताना नवापूर सीमा तपासणी नाक्यावर कारचे टायर फुटल्याने अपघात झाला यात आठ जण जखमी झाले होते. या आठवड्यात दररोज छोटेमोठे अपघात होत आहे. एका आठवड्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे नवापूर तालुक्यातून लवकरच चौपदरीकरणाचे काम सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ट्राॅलाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 11:47 IST