मिळालेल्या माहितीनुसार, १०८ रुग्णवाहिकेवर पायलट म्हणून काम करणारे विशाल निजामसिंग वळवी यांच्या आजोबांची काळ्या रंगाची मोटारसायकल (क्रमांक जी.जे. ०५ एचएन- १५८२) रात्री एक वाजण्याच्या सुमारास क्लिनिकजवळ लावली असता, मध्यरात्रीला चोरीला गेली. या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी मोटारसायकल चोरीचे तपास चक्र फिरवल्याने, मोटारसायकल चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. बेलदारवाड्यातील घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार कैद झाला आहे. रात्री दोन वाजून १८ मिनिटांच्या सुमारास एक युवक रंगावली नदीकडून बेलदारवाड्यातून महादेव मंदिराजवळील परिसरात जातो. त्यानंतर, दोन वाजून २१ मिनिटांनी पल्सर गाडीवर बसून धक्का देत, मोटारसायकल चोरी करीत महामार्गावर निघून जातो. हा युवक १८ ते २० वर्षांचा दिसून येत आहे.
या अनुषंगाने मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडीस आणणारे एक्सपर्ट पोलीस कर्मचारी दादाभाई वाघ यांच्याकडे ही माहिती व फुटेज देण्यात आले आहे. लवकरच मोटारसायकल चोरी करणारा चोरटा जेरबंद होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या आधी बेलदारवाड्यातील घरावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये एक लाल रंगाची पल्सर चोरीला गेली होती. त्याचा तपास वाघ यांनी लावल्याने, तत्काळ मोटारसायकल मिळून आली होती. त्या अनुषंगाने ही मोटारसायकल लवकर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
युवकांमध्ये स्पोर्ट बाइकची क्रेझ अधिक असल्याने, पल्सर मोटारसायकलीची डिमांड मार्केटमध्ये वाढल्यामुळे चोरटे स्पोर्ट बाइकला टार्गेट करून बाइकचोरी करीत आहे. स्पोर्ट बाइकधारकांनी रात्रीच्या वेळेस मोटारसायकल हँडल लॉक व साखळीने लॉक करून ठेवणे गरजेचे आहे. चोरट्यांचा स्पोर्ट बाइकवर डोळा असून, दिवसभरात टेहळणी केली जाते. मोटारसायकल चोरीचे नियोजन करून रात्रीच्या दरम्यान मोटारसायकल चोरी केली जाते. यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. पल्सर स्पोर्ट बाइकची चोरी करणारी टोळी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात व गुजरात राज्यात सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.