लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मातृभाषेतील शिक्षण हे ज्ञानार्जन प्रक्रीयेत गोडी निर्माण करणारे आणि अधिक आनंददायी असते़ असे शिक्षण विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करते़ त्यामुळे मराठी भाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेला विश्वासाने सामारे जावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले़जिल्हा माहिती कार्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित शहरातील एकलव्य प्रशिक्षण उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा भाषा दिन साजरा करण्यात आला़ यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, केंद्राचे नियंत्रण अधिकारी प्राचार्य डॉ.डी.एस.पाटील, संदीप गावीत, दिनेश चौरे उपस्थित होते.मराठी भाषा आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी मार्गदर्शन केले़ पुढे ते म्हणाले की, भाषा हे ज्ञानग्रहण करण्याचे केवळ माध्यम आहे. जीवनात मिळवलेल्या ज्ञानाला महत्व आहे. भाषेच्या आधारे गुणवत्ता निश्चित होत नाही. मातृभाषेविषयी अधिक आत्मीयता असल्याने व ती रोजच्या व्यवहारात उपयोगात आणली जात असल्याने मातृभाषेत शिक्षणाविषयी गोडी निर्माण होते आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्ञानग्रहण करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होते़ ज्ञान मिळविण्यासाठी प्रत्येक भाषा महत्वाची आहे. इंग्रजी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयोगात आणली जाणारी भाषा असल्याने इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व गरजेचे असले तरी यशासाठी ती अट नाही. त्यामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेतून विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. मातृभाषेतून शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांची संख्या अधिक आहे़डॉ.मोघे यांनी मराठी भाषा गौरव दिनाबाबत माहिती दिली.प्राचार्य डॉ़ पाटील यांनी केंद्रातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाल्याची माहिती दिली़
मातृभाषेतील शिक्षण अधिक आनंददायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:20 IST