याबाबत वृत्त असे की, म्हसावद, ता. शहादा येथील राधाबाई शंकर चौधरी (९२) यांचे वृध्दापकाळाने बुधवारी पहाटे साडेचार वाजता निधन झाले. सकाळी सहा वाजेपर्यंत अंत्यविधी संस्कार करण्यात आले. मयत राधाबाई यांचा मोठा मुलगा गोविंद शंकर चौधरी (६९) यांना औषधोपचारासाठी नाशिक येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांना आईच्या निधनाची वार्ताही देण्यात आली नाही तरी नियतीच्या मनात वेगळाच डाव होता. आईच्या निधनाला आठ तास होत नाही व चौधरी कुटुंबीय आईच्या निधनातून सावरत नाही तोच १२ वाजता नाशिकहून मोठ्या मुलाच्या निधनाची बातमी घरी येऊन धडकली. ऐनवेळी दुहेरी संकट... काय करावे आणि काय करू नये ही स्थिती... सर्वांची मने अगदी सुन्न आणि नि:शब्द... सर्वदूर कोरोनासदृश वातावरण असल्याने त्यांचा मृतदेह म्हसावदला न आणता नाशिक येथेच अंत्यसंस्कार विधी पार पाडण्यात आला. आईपाठोपाठ मुलाचेही निधन झाल्याने चौधरी कुटुंबीय दुःखाच्या शोकसागरात बुडाले आहे. म्हसावद गावात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
आठ तासाच्या अंतराने आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST