नंदुरबार : कोरोना लसीसंदर्भात असलेल्या विविध अफवा आता कमी होत असल्या तरी ग्रामीण आणि दुर्गम भागात अद्यापही अनेक गैरसमज आहेत. त्यात प्रामुख्याने लस घेतल्यानंतर मृत्यू ओढवणे, वांझ होणे, अपंगत्व येणे यासह इतर अफवांचा समावेश आहे. यामुळे प्रशासनाने विविध माध्यमांतून जनजागृतीवर जोर दिला असून अनेक गावात १०० टक्के लसीकरण झालेले असल्याचे दिलासादायक चित्रदेखील जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यात लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात विविध गैरसमज व भीती होती. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर कुणी फिरकतदेखील नव्हते. अनेक गावांमध्ये तर ग्रामस्थांनी लसीकरण करणाऱ्या टीमला पिटाळूनदेखील लावले होते. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचे टार्गेट पूर्ण होईल की नाही अशी शंका होती. परंतु विविध माध्यमातून जनजागृती करीत अफवांना पायबंद घालण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. यासाठी स्थानिक कलापथके, स्थानिक बोलीभाषा यांचा सर्वाधिक वापर केला जात आहे. विविध संघटना, संस्थादेखील यासाठी आता सरसावल्या असल्याने लसीकरणाचे आकडे वाढू लागले आहेत.