लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा/बोरद : गेल्या 82 वर्षाची परंपरा लाभलेल्या मोरवड येथील संत गुलाम महाराजांचा दिपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील लाखो-भाविक सहभागी झाले होते. यामुळे मोरवड परिसरातील धार्मिक वातावरण ढवळून निघाले होते. याशिवाय दिव्यांचा लख्ख प्रकाशाने परिसर उजळून निघाला होता.मोरवड, ता.तळोदा येथील आदिवासी संत गुलाम महाराज यांनी समाजातील व्यसनाधिनता दूर करून मुख्य प्रवाहात आणले. साहजिकच बाबांच्या व्यसनमुक्तीच्या संदेशामुळे मोठय़ा प्रमाणात समाज त्यांच्या कार्याला जोडला गेला. यासाठी त्यांनी जागृती करून आपल मुळ धर्माची स्थापना केली. तेव्हापासूनच एकमेकांच्या सन्मानासाठी त्यांचे अनुयायी आप की जय म्हणतात. बाबांच्या व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी 1937 पासून म्हणजे ब्रिटीश काळापासून दरवर्षी बाबाच्या समाधी स्थळी मोरवड येथे लक्ष्मीपूजन व महाशिवरात्रीला सामूहिक आरती पूजन सोहळा साजरा करण्यात येतो. गेल्या 82 वर्षाची परंपरा लाभलेला हा दिपोत्सव, आरतीपूजन सोहळा रविवारी रात्री मोरवड येथे मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील लाखो भाविक सहभाग झाले होते. तत्पूर्वी रविवारी सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक बाबांच्या मठाच्या स्थळी दाखल झाले होते. तेथे दिवसभर रामधून, सत्संग, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले होते. त्यानंतर सायंकाळी सात वाजेला मठस्थळापासून बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यांवरून काढून रात्री 12 वाजेला समाधी स्थळी पोहोचली. या वेळी अनुयायी व सुवासिनींनी हातात आरती घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदविला. यामुळे दिव्यांचा लख्ख प्रकाशाने मोरवड परिसर झगमून निघाला. बाबांच्या समाधी स्थळी सामूहिक आरती पूजन मिरवणूक विसर्जीत करण्यात आली. बाबांचे अनुयायी लक्ष्मण महाराज यांनी भाविकांना व्यसनमुक्तीचा संदेश वाचून दाखविला. दारु पिऊ नका, मास खाऊ नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, स्वच्छतेची कास धरण्याचे आवाहन केले. शेवटी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.या दिपोत्सव कार्यक्रमास आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, डॉ.कांतीलाल टाटीया, हिरामण पाडवी, नगरसेवक हिरालाल पाडवी, सुरेश पाडवी, नितीन पाडवी, कृष्णा पाडवी, अनिल पाडवी, प्रविण वळवी, जे.एस. पाडवी, नारायण ठाकरे सहभागी झाले होते. या सर्वाचे मठपती जितेंद्र पाडवी यांनी स्वागत केले.
लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळले मोरवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:32 IST