लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. साधारणत: अर्धा ते पाऊण पास पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांपासून पावसाची हजेरी असल्याने समाधान व्यक्त होत आहे.जिल्ह्यात अद्यापही सरासरीइतका पाऊस झालेला नाही. दमदार आणि संततधार पावसाची अपेक्षा आहे. जेणेकरून तूट भरून निघेल. परंतु दिवसभरात केवळ अर्धा ते पाऊण तास पाऊस होतो. काही ठिकाणी त्याचा जोर चांगला असतो तर काही ठिकाणी अगदीच तुरळक. त्यामुळे पावसाचे प्रमाण देखील असमान आणि असंतुलीत झाले आहे. त्यामुळे सरासरीची तूट वाढत चालली आहे.बुधवारी दुपारी चार वाजता जिल्ह्यातील शहादा तालुका आणि नंदुरबार व तळोदा तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. शहादा तालुक्यातील तापी पट्टयात पावसाचा जोर अधीक होता. नंदुरबारातही साधारणत: १५ ते २० मिनिटे पाऊस झाला. पावसाचे वातावरण पहात संततधार स्वरूपाचा पाऊस राहील अशी अपेक्षा असतांना मात्र लागलीच पाऊस ओसरला.अधूनमधून पावसाची हजेरी लागत असल्यामुळे मात्र पिकांना त्याचा फायदा होत आहे. परंतु लघु व मध्यम प्रकल्पांसह विहिरी व कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ होत नसल्याची स्थिती आहे. त्याचा फटका पुढील काळात बसणार आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:38 IST