नंदुरबार : शहाद्यातील मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी पाच हजार रुपये रोख व सात हजारांचे दहा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. याबाबत शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याने दुकानमालकाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
शहादा शहरातील पालिका कार्यालयासमोरील के. एस. मार्केटमधील मोबाईल दुकानात ही घटना घडली. दुकानाचे शटरचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील सात हजार रुपये किमतीचे दहा मोबाईल व पाच हजार रुपये रोख चोरून नेले. सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्यावर पोलिसात नोंद करण्यात आली. याबाबत दुकान मालक प्रीतेश अरुणसिंग पवार यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार महाजन करीत आहे.
दरम्यान, शहादाससह परिसरात चोरीचे सत्र वाढले आहे. घरफोडीसह दुकान फोडून चोरी केली जात आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.