रांझणी : तळोदा तालुक्यातील विविध गावांत सध्या ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू असून, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आरोग्य विभाग एकत्रितरित्या जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, तालुक्यातील विविध गावांतील बहुसंख्य नागरिक आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालविण्यासाठी स्थानिक परिसरात रोजगार उपलब्ध न झाल्याने गेल्या १५ ते २० दिवसांपासून राज्यातील पुणे, पंढरपूर तसेच गुजरात राज्यातील सौराष्ट्राकडे मोठ्या संख्येने स्थलांतरित झाले असून, काही कुटुंबही जिथे राेजगार मिळेल त्याठिकाणी स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सदर कुटुंबातील सदस्यांची कोविड लसीकरण करण्याची इच्छा असूनही, फक्त रोजगार नसल्याने स्थलांतरित व्हावे लागत असल्याने जाणकारांकडून खंत व्यक्त होत असून, स्थानिक परिसरातच जर प्रशासनाने रोजगार उपलब्ध करून दिला, तर त्यांचेही वेळेवर लसीकरण होऊन कोविड लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. तसेच शहादा-तळोद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी लसीकरण केलेल्या लाभार्थीला दोन किलो तांदूळ व दोन किलो साखर स्वखर्चाने देण्याचा निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, कोविडच्या काळात ही मदतही महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे.
वंचितांची माहिती आवश्यक
रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या नागरिकांची माहिती संकलित करून ठेवणे आवश्यक असून, ते परतल्यानंतर त्यांनाही प्राधान्याने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.