जिल्हा महिला आणि बालविकास विभाग नंदुरबार यांना निनावी फोनद्वारे मेवास अंकुश विहीर येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार बाल संरक्षण कक्ष नंदुरबार यांनी कार्यवाही केली. बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ यांनी गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, अंगणवाडी ताई, ग्राम रोजगार सेवक यांची एकत्रित भेट घेऊन सदर घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. या कारवाईत महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा परिषद नंदुरबारअंतर्गत असलेल्या जिल्हा समुपदेशन केंद्राचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर बालिका एकल पालक अर्थात तिला आई नाही. बालिकेच्या वडिलांना विश्वासात घेऊन त्यांना ते करत असलेल्या गुन्हाबाबत समजावून सांगितले. तसेच बाल विवाह प्रतिबंध कायद्यातील शिक्षेच्या तरतुदीबाबत संबंधितांना माहिती देण्यात आली. सदर बालिका १८ वर्षे होईपर्यंत लग्न करणार नाही, अशा आशयाची लेखी पालकांकडून करून घेतली आहे. तसेच सदर बालिकेला बाल कल्याण समितीसमोर सादर करण्याबाबत पालकांना सूचना करण्यात आली. बालिका आणि तिच्या १३ वर्षीय बहिणीसोबत चर्चा करण्यात आली आणि दोघींना बाल संगोपन योजनेविषयी माहिती देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संबंधित समुदायाला बाल विवाहाचे दुष्परिणाम, कायद्यातील तरतुदी, अशा अनेक बाबींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी या गावात बाल संरक्षण समिती कार्यान्वित करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. यासाठी अक्कलकुवाचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांचे सहकार्य लाभले. हवालदार भोये, पोलीस शिपाई गोसावी, समुपदेशक गौरव पाटील, जन साहस संस्थेचे जिल्हा समन्वयक विकास मोरे, समुपदेशक अनिता गावित उपस्थित होते. जिल्हा समुपदेशन केंद्राचे सहकार्य लाभले.
मेवास अंकुश विहीर येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST