पोलीस पाटलांची बैठक प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे उपस्थित होते.
बैठकीला मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले की, ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अंधश्रद्धा व गैरसमज आहेत. त्याचे निर्मूलन करण्यासाठी पोलीस पाटलांमार्फत जनजागृती व समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे. काेरोना लसीकरणाबाबत अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासनास माहिती द्यावी. याशिवाय ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. बोगस डॉक्टरांमार्फत कोरोनाचा प्रसार झाल्याचे तालुक्यात निदर्शनास आले आहे. असे बोगस डॉक्टर ग्रामीण भागात उपचार करताना आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्यासंबंधी प्रशासनाशी संपर्क साधून त्याबाबत माहिती द्यावी, पोलीस पाटील गाव व प्रशासनातील दुवा आहे. म्हणून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पोलीस पाटलांनी प्रशासनास कोरोनाची माहिती देण्यास तत्परता दाखवावी, अश्या सूचना उपविभागीय अधिकारी यांनी पोलीस पाटलांना बैठकी दरम्यान दिल्यात. बैठकीला मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते.