लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यापासून सर्वत्र बंद असल्याने शहरातील शहादा नागरी हित संघर्ष समितीच्या वतीने शहरातील नागरिक व मिळकत धारकांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलत द्यावी या मागणीचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.शहादा नागरी हित संघर्ष समितीच्यावतीने शहरातील नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये सवलत मिळण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिकारऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली. गेल्या चार महिन्यापासून देशभरातील उद्योगधंदे बंद आहेत. तसेच शहादा शहरातील सर्व व्यवसाय व्यवहार ठप्प आहेत. उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन शहरात व परिसरात नाहीत. सध्या सुरू असलेले व्यवसाय म्हणजे दैनंदिन खर्चही न निघणारा असा सुरू आहे. राज्य शासन वेतन धारकांसाठी कर्ज घेण्याच्या विचारात आहे. कदाचित या पुढील काळात वेतन कपातदेखील होऊ शकते. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, उद्योजक, रोजंदारीवरील कामगार सर्वच नागरिकांचे अर्थकारण व आरोग्य संकटात आले आहे. त्यांच्यावरील थोडा आर्थिक ताण दूर करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन शहादा शहरातील मालमत्ता व मिळकत धारकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी सरसकट ५० टक्के सूट अर्थात माफ करण्यात येऊन कोरोनाच्या या संकटात आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून गांभीर्यपूर्वक विचार करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर संघर्ष समितीचे अध्यक्ष यशवंत चौधरी, गौरीशंकर बोरसे, मनोज चौधरी, नजमुद्दिन खाटीक, पुरुषोत्तम अहिरराव, जयेंद्र चव्हाण, नीलेश मराठे, चंद्रकांत चौधरीसह आदींच्या सह्या आहेत.
कोरोनामुळे घर व पाणीपट्टीत सूट देण्याची शहादावासीयांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:02 IST