भारतीय जनता पक्षाच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. याविरोधात शिवसेनेतर्फे मंगळवारी निषेध आंदोलन करण्यात आले. डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सकाळपासूनच शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, प्रभारी पोलीस निरीक्षक भरत जाधव यांना निवेदन देऊन केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी केली आहे. शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला ‘जोडे मारो आंदोलन’ केले. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच शिवसेना कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. याप्रसंगी शहर प्रमुख रोहन माळी, संघटक मधुकर मिस्त्री, इद्रीस मेमन, डॉ. सागर पाटील, प्रकाश तिरमले, गुलाब सुतार, पांडुरंग पाटील, दीपक खेडकर, राकेश पारेख व शिवसैनिक उपस्थित होते.
शहाद्यात जोडे मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST