तालुक्यात २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत घरकुलांना मंजुरी मिळाली असून, सद्य:स्थितीत प्रगतिपथावर सुरू आहे. परंतु, घरकुल योजना ही संथगतीने सुरू असल्याने अनेक लाभार्थी घरकुलच्या प्रतीक्षेत आहेत. रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तालुक्यात घरकुलांची कामे सुरू आहेत. परंतु, अनेक गोरगरीब लाभार्थी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत.
अनुसूचित जातीसाठी रमाई व अनुसूचित जमातीसाठी आदिम घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे-२०२२ अशी घोषणा करून प्रधानमंत्री आवास शहरी व ग्रामीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हजारो नागरिकांनी अर्ज सादर केले. शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार मंजुरीही देण्यात आली. मात्र, लोकसंख्या बघता उद्दिष्टात वाढ करून शासनाने विशेष निधीची तरतूद करणे गरजेचे आहे.
उद्दिष्टपूर्तीला निधीचे ग्रहण
ग्रामीण आदिवासी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास आणि अन्य योजना सुरू करण्यात आल्या. काही ग्रामीण भागात शेकडो कुटुंबांना हक्काचे घर मिळाले. मात्र, प्रशासनातील समन्वयाचा अभाव, काम पूर्ण झाल्यानंतरही निधी देण्यास विलंब, तसेच तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव, आदी कारणांमुळे घरकुलाची कामे थंडबस्त्यात असल्याचे दिसत आहे.