राकसवाडे शिवारात पोलीस गस्तीची गरज
नंदुरबार : तळोदा रस्त्यावरील राकसवाडे शिवारातील रहिवासी वसाहतींच्या परिसरात पोलीस गस्त सुरु करण्याची मागणी आहे. या भागात काही घरे हे कुलूपबंद असल्याने त्याठिकाणी चोरीची शक्यता आहे. लाॅकडाऊनमुळे या वसाहतींमध्ये शुकशुकाट असतो.
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली, वाघोदा व पातोंडा शिवारात वीज पुरवठा सातत्याने बंद होत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. कंपनीकडून सध्या दुरुस्तीची कामे सुरु असल्याने हा वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान वेगवान वारेही वाहत असल्याने वीज वाहिन्या एकमेकांवर घासल्या जावून वीज पुरवठा बंद होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ग्रामीण भागात फवारणीची मागणी
नंदुरबार : तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी धूर फवारणी तसेच सांडपाण्याच्या गटारींवर ॲबेटिंग करण्याची मागणी आहे. पावसाळ्यात कीटकजन्य आजार पसरण्याची भीती असते. हिवताप व ग्रामविकास विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कांदा साठा करण्यावर शेतकरी देताहेत भर
शनिमांडळ : तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी दरांअभावी कांद्याचा साठा करुन ठेवत आहेत. या भागातील कांदा चाळींमध्ये सध्या कांदा ठेवण्याचे काम सुरु आहे. कोरोनामुळे बाजारातील दर स्थिर नसल्याने कांदा दर पडले आहेत. यातून हा निर्णय घेतला गेला आहे.
हळदाणी परिसरात खरीप हंगामाची तयारी
हळदाणी : नवापूर तालुक्यातील हळदाणी परिसरात शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. खते व बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात संपर्क केला जात आहे. तसेच शेतशिवारातील काडी कचरा साफ करुन ट्रॅक्टरच्या माध्यमातून नांगरटी करत शेत तयार करण्याचे काम सुरु आहे. या भागातील शेतकरी पहिल्या पावसानंतर पेरणीला सुरुवात करत असल्याने कामांना गती देण्यात आली आहे.
गतीरोधक हवेत
नंदुरबार : शहरातील प्रकाशा रोडवर करण चाैफुली ते हनुमंत पेट्रोलपंप या दरम्यान गतिरोधक टाकण्याची मागणी आहे. मार्गावर रस्ता रुंदीकरण झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वसाहती असल्याने वर्दळ असते. परिणामी अपघात होण्याची शक्यताही अधिक आहे.
शेतक-यांची हजेरी
नंदुरबार : खरीप हंगाम सुरु होण्यास काहीच दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने शेतकरी शेतीकामांना गती देत आहेत. यातच कृषीपंप, मोटारीचे स्टार्टर, तुटलेले पाईप यासह विविध इलेक्ट्रीक व शेतीपयोगी साहित्य दुरुस्तीही सुरु झाली आहे. याचे नवीन साहित्य शहरी भागात मिळत असल्याने धावपळ सुरु आहे.
उन्हाळी ज्वारीची कापणी
नंदुरबार : नंदुरबार तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात उन्हाळी ज्वारीची लागवड करण्यात येते. या ज्वारीचे पीक यंदा चांगले असल्याने त्याची कापणी सुरु करण्यात आली आहे. कोरड व बागायत अशा दोन्ही क्षेत्रात हे पीक घेण्यात येते. यातून वार्षिक धान्यसाठा होत असल्याने आदिवासी बांधवांकडून उन्हाळी ज्वारी पेरणीला सर्वाधिक पसंती देण्यात येते. यंदा बाजारात ज्वारीचे दरही चांगले असल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण हद्दींमध्ये जनजागृती व्हावी
नंदुरबार : शहरातील होळ तर्फे हवेली, वाघोदा व पातोंडा शिवारातील रहिवासी वसाहतींमध्ये कोरोना, उपाययोजना आणि संभाव्य तिसरी लाट याबाबत जनजागृतीची गरज आहे. अनेक ठिकाणी योग्य ती माहिती नसल्याने प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
योजनांसाठी निराधार करताहेत पाठपुरावा
नंदुरबार : जिल्ह्यात संजय गाधी निराधार योजनांच्या समित्या स्थापित झाल्या आहेत. मोठ्या कालावधीनंतर समिती स्थापन झाल्याने योजनेत समावेश व्हावा यासाठी पात्र निराधार पाठपुरावा करत असून त्यांची दखलही घेतली जात आहे.