नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात गुरुवारी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांनी भारतमातेचे पूजन केले. तसेच थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले. व्यासपीठावर सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावीत, आदिवासी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गावीत,नवापूर तालुकाध्यक्ष भरत गावीत, नंदुरबार नंदुरबार शहराध्यक्ष नरेंद्र माळी उपस्थित होते.
विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे म्हणाले, बूथरचना कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कामाचा आधार आहे. गेल्या काही वर्षांत प्रत्येक बूथवर १ ते ३० कार्यकर्त्यांच्या गट असावा म्हणून प्रयत्न आहे. मतदार यादीतील प्रत्येक पानाला पन्नाप्रमुख असावा. प्रदेशातील सर्व कार्यकर्त्यांचे एकाच वेळी बूथरचनेकडे लक्ष केंद्रित व्हावे या दृष्टीने दि. ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान बूथ संपर्क अभियान दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. जिल्हा व मंडलस्तरावरसुध्दा बूथरचना विषयासाठी एक महामंत्री अथवा प्रमुख पदाधिकाऱ्याचे नाव सुचवावे, असे त्यांनी सांगितले.
३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी एका आठवड्याच्या काळात प्रदेशातील सर्व मंडलांच्या बैठका होतील. जिल्ह्यातील एका मंडलाच्या बैठकीसाठी प्रदेश पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. नमो अॅप कार्यकर्त्यांना तसेच पक्षाच्या समर्थकांना, सहानुभूतीदारांना तसेच सामान्य मतदारांनाही डाऊनलोड करावयास सांगणे, मंडलस्तरावरील पदाधिकाऱ्यांना तसेच विविध मोर्चा, आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी ५-५ बूथची जबाबदारी सोपविणे, सदस्यता यादी अद्ययावत करणे, संघटनमंत्र्यांकडून मागील दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील बूथनिहाय मतदानाची आकडेवारी मिळवणे, सर्व बूथचे मंडल पातळीवर ए-बी-सी-डी अशी वर्गवारी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कोपर्लीमध्ये ५० वर्षांनंतर भाजपने सत्तांतर केल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्षांना धक्का.
कोरोनाकाळात भाजपने भरीव योगदान दिले. जिल्ह्यात १२८२ बूथ असून, जिल्हास्तरावर त्यांची लवकरच बैठक घेण्यात येईल. भाजपतर्फे ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात येणाऱ्या बूथरचना कार्यक्रम यशस्वी करण्यात येईल. श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण समर्पण अभियानात भाजपने सक्रिय सहभाग घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.