मंदाणे : धार्मिक कार्यक्रम असो की, मंदिर उभारणी असो, जो तो आपापल्या परीने सढळ हाताने मदत करणारे लोक प्रसिद्धीही तेवढीच मिळवून घेतात. मात्र, कोणताही गाजावाजा न करता आयुष्यभर कष्टाची नोकरी करून, निवृत्तीनंतर आलेल्या पेंशन रकमेतून तब्बल तीन लाख रुपये खर्चाचे भगवान शंकर तथा महादेवाचे भव्य मंदिर, शहादा तालुक्यातील वडगावजवळील भवानी मातेच्या टेकडीवर बांधणाऱ्या वडगाव येथील रहिवासी व मंदाणे येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महविद्यालयात निवृत्त झालेले शिपाई केशव सरदार पटले यांच्या अंगी असलेले शिवप्रेम परिसरात चर्चेचे ठरले आहे.
मंदाणे येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेले केशव सरदार पटले (पावरा) हे वयाची ६० वर्षे पूर्ण करून मे महिन्याच्या शेवटी सेवानिवृत्त झाले. अतिशय प्रामाणिक, वक्तशीर, श्रमप्रतिष्ठा जपणारा असे विविध मूल्यांची जोपासना करणारे केशव पटले हे अप्पा नावाने सर्वत्र परिचित. जेवढे कष्टाळू तेवढेच ते धार्मिक वृत्तीचे होते. शालेय कामाच्या वेळा व्यतिरिक्त ते मंदाणे येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वटेश्वर मंदिरात जाऊन महादेवाच्या सेवेत दाखल व्हायचे, असा त्यांचा नित्यक्रम. महादेवाची भक्ती करीत त्यांनी आपल्या वडगाव येथे ही महादेवाचे मंदिर असावे, जेणेकरून निवृत्तीनंतर तेथे महादेवाची पूजा कायमस्वरूपी करता येईल, अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून होती आणि ती इच्छा त्यांनी स्वतःच्या तन, मन आणि धनाने पूर्ण करण्याचे स्वप्न निवृत्तीनंतर प्रत्यक्ष साकारल्याने केशव पटले यांच्या या धार्मिक कार्याची चर्चा सर्वदूर सुरू आहे. केशव पटले हे वडगाव येथील रहिवासी असून, वडगाव-घोडले रस्त्यावर खूप उंच असलेल्या टेकडीवर भवानी मातेचे मंदिर आहे. परिसरात एक जागृत देवस्थान व श्रद्धास्थान म्हणून समजल्या जाणाऱ्या या मंदिरात मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, टेकडीवर चढताना सर्व भाविकांची चांगलीच दमछाक होते. अशा वेळी थोडा वेळ विश्रांती मिळेल, या निमित्ताने भाविकांना महादेवाचे दर्शन घेता येईल व सेवा घडेल, असा विचार करून मध्यावर असलेल्या भागात जागा निश्चित करून तेथे केशव पटले हे नवीन महादेवाचे मंदिर उभारणी करीत आहेत. मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत तीन लाख रुपये खर्च येणार आहे. हा संपूर्ण खर्च निवृत्त शिपाई केशव सरदार पटले हे आपल्या पेंशन रकमेतून करीत आहेत. एक महिन्यापासून सुरू असलेले शिव मंदिराचे काम सप्टेंबर अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मंदिराचे काम बऱ्याच उंचावर असल्यामुळे तेथे बांधकामासाठी लागणारे पाणी, लोखंड, सिमेंट, खडी, वाळू नेणे कसरतीचे ठरत आहे. मंदिर बांधकामासाठी केशव पटले हे आर्थिक भारासह स्वतः अंगमेहनत करून पूर्ण वेळ काम करीत आहेत. त्यांच्या या अनोख्या धार्मिक कार्यामुळे उत्कृष्ट महादेव मंदिर उभारले जात असल्याने भवानी टेकडीला आगळे वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. या धार्मिक कार्याबद्दल केशव पटले यांचे परिसरातील भाविक वर्गाकडून कौतुक केले जात आहे.