रुग्णसंख्या कमी होत असल्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३१ मे ते ६ जून या आठवडाभरातील चित्र पाहता आठवडाभरात पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळले आहेत. या जिल्ह्यात पाच हजार १५ रुग्ण आढळले असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत १९.०६ टक्के रुग्णसंख्या जास्त आहे, तर रायगड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ८६५ रुग्ण आढळले आहेत. हे गेल्या आठवड्याच्या तुलनेत १५.९५ टक्के जास्त आहे. हजारांपेक्षा अधिक रुग्ण सात जिल्ह्यांमध्ये आढळले असून, त्यात सिंधुदुर्गसह सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात एक हजारापेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्ह्यात अनुक्रमे ६८९ आणि ७८५ रुग्ण आढळले आहेत.
खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार हे तिन्ही जिल्हे मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या यादीत शेवटून पाच जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यात सर्वांत कमी म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात केवळ ७३ रुग्ण गेल्या आठवड्यात आढळले, तर धुळे जिल्ह्यात १५८ व जळगाव जिल्ह्यात १६२ रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत विचार केल्यास हे प्रमाण अनुक्रमे नंदुरबारचे ४२.११ टक्के, धुळ्याचे २३.०३ टक्के जळगावचे २५.३५ टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली आहे.