आता दिवाळी नंतरच लग्नाच्या तारखा आहेत. असे असले तरी मधल्या काळात मुलगी पाहून जमवून ठेवून दिवाळीनंतर बार उडवायचा अनेकांचा इरादा आहे. कारण, कोरोनाची तिसरी लाट आली तर... या भीतीने उपवर मंडळी धावपळ करताना दिसत आहेत. नंदुरबारातील अशाच एका ३२ वर्षीय युवकाला नातेवाईक, मित्र मंडळी यंदा लग्न करूनच टाक म्हणून आग्रहही करीत आहेत आणि टोमणाही मारत आहेत. बिचारा अनेक ठिकाणी मुली पाहून आला. वधू-वर सूचक मंडळात देखील नाव नोंदवून आला. परंतु, अपेक्षित मुलगीच त्याला भेटत नसल्याची स्थिती आहे. कुठे वय आड येते तर कुठे त्याचा व्यवसाय आणि कुठे घराणे. त्यामुळे पुरता बेजार झालेला संबंधित युवक एकटाच मुलगी पाहण्याची केविलवाणी धडपड करीत आहे. यंदाही लग्न जमले नाहीच तर काही खरे नाही. एकीकडे वय वाढत आहे आणि दुसरीकडे मुलीवाले जास्त वयाचा म्हणून नकार देत आहेत. अशा कात्रीत सापडलेल्या युवकाला त्याच्या मित्रांनी धीर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. बिचारा वैतागाने मित्रांना म्हणाला, अरे यार लग्न कर म्हणून सल्ले देणारे, सांगणारे १०० नातेवाईक आहेत, परंतु लग्नासाठी मुलगी शोधणारा एकही नातेवाईक नाही, मित्र नाही... मोठी शोकांतिका आहे यार. काय करू म्हणत स्वत:लाच दोष देत राहिला. मित्रही त्याच्या या वाक्यावर निरुत्तर झाले... - मनोज शेलार
लग्नाचा सल्ला देणारे भरपूर, मुलगी शोधणारा एकही नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST