तळोदा तालुक्यातील बोरद येथील शेतकरी दत्तू रोहिदास पाटील यांच्या बोरद शिवारातील गट क्रमांक २१४ मधील शेतातील पपई पिकाची २५ ते ३० झाडे कापून नुकसान केल्याची घटना घडली. बोरद येथीलच जयसिंग चिंधा ठाकरे व बालम तुकड्या पवार यांच्या कळमसरे रस्त्यावर असलेल्या शेतातील कापसाच्या पिकाचीही नासधूस करून ४० ते ५० झाडांची कत्तल केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. बोरद पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात एका आठवड्यात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
सोमवारी रात्री ८ ते १२ वाजेदरम्यान शेतात कुणीही नसल्याचा अंदाज घेत, अज्ञात माथेफिरूने काठीच्या साहाय्याने पिकांची नासधूस करत, साधारण २५ ते ३० झाडांची कत्तल केली. पपईच्या पिकाला अर्ध्यापासून मोडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मोठ्या परिश्रमाने वाढविलेल्या पाच-सहा महिन्यांच्या पपईच्या पिकाची अशा प्रकारे नासधूस होऊन हातातोंडाशी आलेला घास त्या माथेफिरूने हिरावून घेतल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
याबाबत शेतमालकाने तळोदा पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे संपर्क साधला, परंतु एकही पोलीस कर्मचारी तेथे पाहणीसाठी उशिरापर्यंत आले नसल्याचे सांगण्यात आले. पिकांच्या नुकसानीची अशी वस्तुस्थिती असताना शेतकऱ्यांना कुणी वालीच नसल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुळात बोरद दूरक्षेत्रात पोलीस कर्मचारी हजर राहणे अपेक्षित असताना, तेथे एकही कर्मचारी हजर नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कळमसरे रस्त्यावरही कापसाच्या झाडांचे नुकसान केले आहे. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असून, अशाच प्रकारची घटना मागील आठवड्यात मोड येथील भगवान लोहार यांच्या कळमसरे शिवारातील शेतात घडली होती. अशा घटनांनी शेतकरी भयभीत झाले आहेत. त्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असला, तरी अद्यापपावेतो माथेफिरूचा तपास लागला नसल्याने पुन्हा-पुन्हा अशाच घटनांचे सत्र वाढतच चालले आहे. दोषींचा वेळेवर शोध लागत नसल्यामुळे अनेक शेतकरी तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी अज्ञात माथेफिरूंचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असून, रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.