कोठार : सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तळोदा शहरातील रस्त्यावर सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. शिवाय लॉकडाऊनमधील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानेही सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार स्वतः रस्त्यावर उतरले. पालिका व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करत चार दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. त्यात जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सोमवारी तळोदा शहरात इतर दुकानेदेखील सुरू होती. शहरातील मुख्य रस्त्यावर सकाळी आठ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. लॉकडाऊनच्या नियमांची ऐसीतैसी झाल्याची स्थिती होती.
शहरातील ही परिस्थिती पाहता तहसीलदार संपूर्ण प्रशासनासह रस्त्यावर उतरले. रस्त्यावर बेशिस्तपणे फिरणारे तसेच लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली.
तळोदा शहरात एका सराफा दुकानात तहसीलदार व पथकाला काही महिलांची गर्दी दिसून आली. त्याठिकाणी जाऊन त्यांनी त्या सराफा व्यावसायिकाला दंड आकारला. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या पथकातील महसूल कर्मचारी व पालिका कर्मचाऱ्यांना सराफा व्यावसायिक व ग्राहक महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या कारवाईत कापड व्यावसायिकाचे दुकान सुरू असल्याचे तहसीलदार व पथकाच्या लक्षात आले. या कारवाईत कापड दुकानदारावर एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तिसऱ्या कारवाईत बायपास रस्त्यावर पथकाला सर्व प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर बसवून हॉटेल सुरू असल्याचे दिसून आले. या व्यावसायिकाला समज देत पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. नगर पालिका प्रशासन व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई केली.
तहसीलदार गिरीश वखारे यांच्या नेतृत्त्वाखाली
नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, श्रीकांत लोमटे, मंडल अधिकारी समाधान पाटील, पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी, पालिकेचे राजेंद्र माळी, स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी, मोहन सूर्यवंशी आदींचा या पथकात समावेश होता.
दरम्यान, तळोदा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात व अनेक गावांत लॉकडाऊन असताना ग्रामीण भागातील नागरिकदेखील मोठ्या संख्येने बाजारासाठी शहरात आज दिसून आले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक खासगी गाड्यादेखील ठिकठिकाणी दिसून आल्या. जणू काही इथे कोरोना व लॉकडाऊन काहीच नाही, अशी परिस्थिती एकंदरीत शहरात सर्वत्र दिसून आली. कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील अनेक व्यावसायिकांकडून 'केवळ आमचेच दुकान सुरू असल्याचे दिसते का?, शेजारील दिसत नाही का?' अशा प्रकारच्या अरेरावीचा सामना करावा लागला. लोकांमध्ये कोरोनाचे कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याची स्थिती असून, प्रशासनदेखील हतबल झाल्याचे चित्र आहे.