लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोहिदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली़ घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे़कळमसरे-मोहिदे येथील मुलगा शेळ्या घेऊन मोहिदे गावापासून एक किलोमीटर अंतरावर गेला होता़ सायंकाळी शेळ्या घेऊन परत येत असताना अचानक कळपावर बिबट्याने हल्ला केला़ यात एका बोकडावर झडप घालून बिबट्याने त्याला फरफटत पपईच्या शेतात नेले होते़ शेळ्या राखणाऱ्या मुलाने ही माहिती मोहिदे गावात दिल्यानंतर उपसरपंच आनंद रमण चौधरी यांनी वनविभागाला माहिती दिली होती़ त्यानुसार वनपाल नंदू पाटील यांनी भेट देत माहिती घेतली़ दरम्यान शांताराम रहिमसिंग बगले यांच्या मालकीचा बोकड बिबट्याने ठार केला आहे़ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र जगदाळे यांनी पंचनामा केला़ या भागात नर आणि मादी बिबट्याचा संचार असल्याचे शेतकरी व मजूरांकडून सांगण्यात आले आहे़ यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आहे़
तळोदा तालुक्यात मोहिदे शिवारात बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:58 IST