नंदुरबार : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या ११ व पंचायत समितीच्या १४ जागांमधून महिला आरक्षण सोडत २३ मार्च रोजी काढण्यात येणार आहे. जि.प.च्या पाच तर पं.स.च्या आठ जागा महिलांसाठी राहणार आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या ११ व पंचायत समितीच्या १४ जागांवरील सदस्यांची निवड ४ मार्चपासून रद्द ठरविण्यात आली आहे. या जागांवर आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या रद्द झालेल्या सर्व ११ जागा या सर्वसाधारण झाल्या आहेत. त्यातील पाच जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
नंदुरबार पंचायत समितीच्या पाच, शहादा पंचायत समितीच्या आठ तर अक्कलकुवा पंचायत समितीची एक जागादेखील सर्वसाधारण झाली आहे. नंदुरबार पंचायत समितीच्या पाचपैकी तीन जागा महिला, शहादा पंचायत समितीच्या आठपैकी चार व अक्कलकुवा पंचायत समितीची एकपैकी एक जागा महिला राखीव होणार आहे.