नंदुरबारला कोविड तपासणी लॅब कराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:00 PM2020-07-02T13:00:24+5:302020-07-02T13:00:31+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुरूवातीला कोरोना संसर्गापासून बचावलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील आता कोरोना रूग्णांची संख्या वाढत ...

Kovid testing lab to Nandurbar! | नंदुरबारला कोविड तपासणी लॅब कराच!

नंदुरबारला कोविड तपासणी लॅब कराच!

Next

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सुरूवातीला कोरोना संसर्गापासून बचावलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील आता कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. एकीकडे रूग्ण संख्या वाढत असताना तपासणीचे अहवाल येण्यास मात्र विलंब होत असल्याने उपाययोजनांवरही त्याचा परिणाम जाणवत असल्याने आता जिल्ह्यात स्वतंत्र कोविड तपासणी लॅब त्वरित सुरू होणे गरजेचे आहे. शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ही लॅब सुरू करण्यास मंजुरी दिली असून, जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी देखील महाराष्टÑ दिनीच ही लॅब त्वरित सुरू करण्याचे संकेत दिले होते. तथापि दोन महिन्यात अद्यापही ती सुरू झाली नसल्याने त्याचा गंभीपणे पाठपुरावा करण्याची गरज आहे.
नंदुरबार जिल्हा तसा वैद्यकीय सुविधेबाबत अभागीच आहे. जिल्हानिर्मितीनंतर जिल्हा रूग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास दोन दशकांचा कालावधी लागला. अजूनही अनेक महत्त्वाची पदे रिक्तच आहेत. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा १० वर्षांपूर्वी झाली. पण अजूनही तांत्रिक अडचणींचा कारणावरून हे महाविद्यालय रखडलेच आहे. जिल्ह्याला स्वतंत्र जिल्हा महिला रूग्णायही मिळाले. त्याची इमारतीचे बांधकाम झाले. पण अजूनही ते सुरू होऊ शकले नाही. तशीच अवस्था सध्या कोविड तपासणी लॅबची होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातही प्राथमिक तयारी करण्यात आली. जिल्हा रूग्णालयात या लॅबसाठी बांधकाम विभागाकडून तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.
पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी देखील महाराष्टÑ दिनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना नंदुरबार जिल्ह्यात लवकरच स्वतंत्र लॅब सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात दोन महिन्यात मात्र ही लॅब सुरू होऊ शकली नाही. वास्तविक सध्यातर जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. आत्ताशी जिल्ह्यात जेमतेम दोन हजार देखील तपासण्या झालेल्या नाहीत. पण रूग्णांची संख्या मात्र १६३ आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरवाड्यात रूग्णांची संख्या अधिकच वाढत आहे. नवीन रूग्ण येत असल्याने त्यांच्या संपर्कातील लोकांची संख्याही तेवढीच वाढत आहे. त्यामुळे संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन केले जात असले तरी काही लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहे. त्यांचे अहवाल तीन ते चार दिवस प्रलंबित राहतात. हे अहवाल आल्यानंतर जर अहवाल पॉझीटिव्ह आला तर पुन्हा त्याची संपर्काची साखळी शोधली जाते. अहवाल चार दिवस उशिरा येत असल्याने संपर्क साखळीतील व्यक्ति इतर व्यक्तिंचा संपर्कात येतो. त्यामुळे प्रशासनाचीही तेवढीच जोखीम वाढते. त्यामुळे अहवाल तत्काळ मिळाल्यास संपर्क साखळीतील व्यक्ती त्वरित शोधता येतात व उपाययोजना तत्काळ करता येतात.
सध्या नंदुरबार येथील स्वॅब तपासणीसाठी धुळ्याला पाठविले जात आहेत. त्यासाठी स्वतंत्र वाहन पाठवावे लागते. त्यामुळे वाहतुकीच्या व मनुष्य बळाचा खर्चही वाढतो. वेळही वाया जातो. धुळे येथील प्रयोगशाळेत धुळ्यासह अन्यही ठिकाणचा व्याप आहे. त्यामुळे अहवाल उशिरा येतात. धुळ्यातच रूग्णांचे प्रमाण वाढल्याने तोही ताण तेथे वाढला आहे. सध्या तर तेथील प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने नंदुरबार येथील स्वॅब आता नाशिक किंवा पुण्याला पाठविण्यात येत आहेत. त्याचाही वेळ आणि खर्च वाढणार आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता नंदुरबार येथील कोविड तपासणी प्रयोगशाळा तत्काळ सुरू होण्याची गरज आहे. या प्रयोगशाळेसाठी इतर बाबींची पूर्तता स्थानिक प्रशासनाने केली असली तरी शासनाकडून मिळणाºया ‘ट्रुन्यॅट’ हे यंत्र तत्काळ उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. या यंत्रासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासनाने शासनाला नवीन यंत्र उपलब्ध होत नसेल तर ज्या ठिकाणी ताण कमी आहे अशा ठिकाणचे यंत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही केली आहे. परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही यासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करण्याची गरज आहे. नंदुरबारला ही लॅब त्वरित सुरू न झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सध्या नवीन रूग्ण वाढत असल्याने तत्काल उपाययोजनेसाठी तत्काळ तपासणी अहवालही उपलब्ध होणे तेवढेच गरजेचे आहे.

Web Title: Kovid testing lab to Nandurbar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.