सोमवारी दुपारी धुळे ते कालीबेल बसमध्ये (क्रमांक एम.एच. १४ बीटी- २१९४) प्रवासी चढत होते. त्यावेळी एक जण प्रवाशांचे खिसे कापून चोरी करीत असल्याचे लक्षात आले. ही माहिती पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना देण्यात आली. बुधवंत हे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ, पोलीस कर्मचारी मेहरसिंग वळवी, अमोल राठोड, जगदीश पाटील, राकेश मोरे, दिनकर चव्हाण यांच्यासह तातडीने शहादा बसस्थानकात पोहोचले. चोरट्याला पोलीस आल्याचे कळताच तो बसस्थानकाच्या भिंतीवरून फरार होण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. त्याच्याकडून तीन पाकीट जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ हे करीत आहेत.
दरम्यान, शहादा बसस्थानक आवारात गेल्या अनेक दिवसांपासून पाकिटमारी व चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी बसस्थानकात कायम थांबून या घटनांना आवर घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.