प्रकाशा : तापीवरील २२ उपसा जलसिंचन योजनाच्या दुरुस्ती कामासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावरून देखील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्रान्वये दिल्याने उपसा सिंचन योजना जलसंघर्ष समितीचे सोमवारचे नियोजित जलसमाधी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, प्रकाशा बॅरेज परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तापीवरील २२ उपसा जलसिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रश्न रेंगाळला आहे. दोन्ही बॅरेजमध्ये पाणी असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे उपसा सिंचन योजनेच्या दुुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. परंतु निधीचा प्रश्न आणि इतर कारणांमुळे अद्यापही दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. याबाबत संघर्ष समितीने सोमवार, १ रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या.
सकाळी संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जिजाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी तापी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलेल्या आश्वासनाचे लेखी पत्र समितीला देण्यात आले.
त्यात म्हटले आहे की, उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावित कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याबाबत योजनेच्या कामकाजाशी संबंधित कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता पाठपुरावा करीत आहेत. योजनेची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले.
या पत्राच्या आधारे अधिकारी व समिती पदाधिकारी यांनी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.
आंदोलन करणाऱ्या १२ शेतकऱ्यांना पोलीस प्रशासनातर्फे नोटीस बजावण्यात आली असून १ फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत कुठलेही सभा आंदोलन करू नये. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करू नये त्याचप्रमाणे मुंबई पोलीस कायद्याचे पालन करावे, अन्यथा आपल्या विरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले होते. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.