नंदुरबार : रहदारीचे नियम मोडणे हा आमचा हक्कच आहे... अशा आविर्भावात शहरातील वाहनचालक वाहन चालवीत असतात. काहीवेळा तर वाहतूक पोलिसांसमोरच राँग साईडने घुसून मर्दुमकी दाखविण्याचाही प्रकार दिसून येतो. असे असले तरी वाहतूक पोलीस विभागातर्फे अशांना वठणीवर आणण्याचे प्रकारही होत असतात. काहीवेळा दंड आकारणी तर काही वेळा थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.
नंदुरबारातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आधीच अरुंद रस्ते, त्यात अतिक्रमण वाढलेले, वाढलेली लोकसंख्या आणि वाढलेली वाहने यामुळे शहरातील रहदारीला शिस्त लावता लावता वाहतूक शाखेचे नाकीनऊ येतात. त्यात काही मुजोर वाहनचालक तर रहदारीचे नियम तोडणे हा आपला हक्कच असल्याचे दाखवतात. नंदुरबारात अरुंद रस्ते, लहान चौक असल्यामुळे सिग्नल यंत्रणा नाही. ती यशस्वीदेखील होऊ शकत नाही. त्यामुळे मुख्य चौकांमध्ये वाहतूक पोलिसांना नेमावे लागते. त्यांच्यामार्फत वाहतुकीचे नियमन केले जाते.
काही वर्षांपूर्वी पालिकेतर्फे सिग्नल यंत्रणेची काही मुख्य चौकात चाचपणीदेखील करण्यात आली. परंतु ती यशस्वी झाली नाही. त्यामुळे सिग्नल यंत्रणेचा प्रस्ताव कायमस्वरूपी बारगळला.
नंदुरबार शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे नियम मोडणारे, कागदपत्रे सोबत न बाळगणारे अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाते. दररोज सरासरी ७० ते ८० जणांवर कारवाई होत असते. मोहिमेच्या वेळी ही संख्या अधिक वाढते.
वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याऐवजी संबंधित कर्मचारी केसेसचे टार्गेट पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे.
-दुचाकी वाहनचालक.
वाघेश्वरी चौफुलीवर भररस्त्यावर वाहने अडवून कागदपत्रे तपासणी केली जाते. या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. तेथे वाहतुकीची कोंडी असते ते टाळण्याचा प्रयत्न व्हावा.
-चारचाकी वाहनचालक.
नंदुरबारच्या वळण रस्त्याने वाहन घेऊन जाणे म्हणजे दिव्यच असते. जिल्ह्याबाहेरील वाहन दिसताच कारवाई अटळ असते. ई-चालानच्या माध्यमातून कारवाई झाली आहे.
-जड वाहनचालक