जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:31 AM2021-03-05T04:31:15+5:302021-03-05T04:31:15+5:30
जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा नियमितपणे सुरु झाल्या असून नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच ...
जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा नियमितपणे सुरु झाल्या असून नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण राज्यात सर्वप्रथम शाळा सुरु करण्याची प्रक्रिया नंदुरबार जिल्ह्यात पार पडली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणाची मोठी हानी झाली आहे. ही हानी भरुन काढणे शिक्षण यंत्रणेतील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून शाळा सुरु करताना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही शिक्षकांना देण्यात आले आहेत. सर्व शिक्षकांनी शाळेमध्ये पूर्णवेळ उपस्थित राहून वर्गखोल्या व शालेय परिसर स्वच्छ करुन घ्यावात. शाळा अनुदान, लोकसहभाग व ग्रामपंचायत निधी अशा विविध मार्गांनी सॅनिटायझर व इतर अनुषंगिक साहित्य शाळेत उपलब्ध करुन घ्यावे. प्रायोगिक तत्वावर सामाजिक अंतर राखून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपस्थित ठेवून नियमित अध्यपन करावे. वरील बाबी करणे सक्तीचे नसले तरी जिल्ह्यातील विशेष करुन अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील नियंत्रणात असलेली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या भागात शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य शिक्षकांनी व पर्यायाने शिक्षण विभागाच्या यंत्रणेने पार पाडावे. तसेच इतर तालुक्यांनीही याबाबत पुढाकार घेऊन कार्यवाही करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.