नंदुरबार : लोकसभा सार्वत्रिक निवडणूककरीता नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदारसंघ क्षेत्राच्या बाहेरील क्षेत्रामधून उमेदवारांना मदत करण्यासाठी आलेले आणि मतदारसंघाचे मतदान नसलेले कार्यकर्ते, प्रतिनिधी, हिंतचिंतकांनी मतदारसंघाचे क्षेत्र सोडून २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात परत येवू नये, आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशारा जिल्हाधिकारी डॉ.बालाजी मंजुळे यांनी दिला आहे.भारत निवडणूक आयोगाने १० मार्च २०१९ पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. त्याच दिवसापासून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू झालेली आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असून २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याकरीता भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२६ नुसार ज्या मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे, अशा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया संपण्याच्या ४८ तास अगोदर किंवा प्रचार करण्याची मुदत संपल्यानंतर ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी, मतदारसंघ क्षेत्राच्या बाहेरील, भागामधून /क्षेत्रामधून उमेदवारांना मदत करण्यास आलेले कार्यकर्ते, प्रतिनिधी, हितचिंतक इत्यादींना व जे या मतदारसंघाच्या क्षेत्रातील मतदार नाहीत, अशा सर्व व्यक्तींना या मतदारसंघाचे क्षेत्र सोडून जाणे आवश्यक आहे. तसेच २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यत क्षेत्रात परत येण्याची अनुमती नाही. अशा व्यक्ती या मतदारसंघाच्या क्षेत्रात आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले.पोलिस विभागाने धर्मशाळा, गेस्ट हाऊस, लॉज आदींची यादी बनवून तसेच भाड्याने घेतलेली घरे इत्यादी सर्व स्थळांची पाहणी यापूर्वीच सुरू केली आहे. तसेच मतदान क्षेत्रातील सीमांवर चेकपोस्ट, तपासणी नाका उभारून व मतदान क्षेत्राच्या बाहेरुन येणाºया वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. अशा सर्व व्यक्तींचे अथवा समूहातील व्यक्तींची ओळख तपासण्यात येत आहे. ते या मतदान क्षेत्रातील आहेत किंवा नाही याची देखील तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही मंजुळे यांनी निर्देशित केले आहे.
बाहेरील व्यक्तींना मतदारसंघ सोडण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:48 IST