लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दसर्याच्या पार्श्वभूमीवर मुबलक आवक होणारा झेंडू यंदा बाजारातून नाहीसा झाल्याचा अनुभव ग्राहकांना आला आहे. रविवारी सकाळी झेंडू खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोसळलेल्या पावसामुळे यंदा विविध पिकांचे नुकसान झाले आहे. यात झेंडूचाही समावेश असून नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात लागवड करण्यात आलेल्या झेंडू रोपांचे नुकसान झाल्याने यंदा झेंडूची आवक कमीच असण्याचा अंदाज होता. हा अंदाज शनिवारी सायंकाळपासून खरा ठरला होता. लगतच्या साक्री तालुक्यासह गुजरात राज्यातून झेंडूची आवक झालेली नसल्याने रविवारी झेंडूचे दर आकाशाला भिडणार अशी शक्यता होती. रविवारी शहरातील सुभाष चाैक व मंगळबाजारात झेंडूच मिळत नसल्याने ग्राहक रिकाम्या हाताने परत गेले. सकाळी काही वेळ ८० ते १०० रूपये प्रती किलो दराने मिळणारा झेंडू ११ वाजेनंतर बाजारात दिसून आला नाही. परीणामी गाडी व घरांची सजावट करण्यासाठी उत्सुक असलेल्यांनी कागदी फुलमाळा तसेच वाढीव दरातील झेंडू फुलांच्या छोटेखानी माळा खरेदी करत दसरा साजरा केला. दरम्यान रविवारी आपट्याची पानेही न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. यंदा कोरोनामुळे दसर्याला आप्तेष्ट मित्रांची होणारी गळाभेटही टळली होती. सामाजिक अंतर ठेवतही नागरीकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
बाजारात उसळला महागाईचा चेंडू यंदाच्या दसर्याला दिसलाच नाही झेंडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 13:05 IST