नंदुरबार : व्हीजेएनटी संवर्गाचे नव्याने व स्वतंत्र सर्वेक्षण करून त्यांना सवलती मिळाव्यात, अशी मागणी आधीपासूनच आहे. यासाठी पुन्हा राज्यभर जनजागृती करण्यात येऊन संघटन बांधणीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी येथील मेळाव्यात बोलताना दिली.
नंदुरबारात आमदार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गाचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना तसेच निवडणुकीची आचारसंहिता या बाबी लक्षात घेऊन मेळावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार संजय राठोड यांनी सांगितले, व्हीजेएनटीला एसटी ब मध्ये स्थान मिळावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. या माध्यमातून आंतरपरिवर्तनीय आरक्षण मिळावे याकरिता प्रयत्न सुरू आहेत. २८ जमातींना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व नोकरीतील सवलती वाढवून मिळाव्या. ओबीसी आरक्षणाबाबत देखील त्यांनी मनोगत व्यक्त केेले. यावेळी क्रिमिलिअर दाखला, तांडा वस्तीला महसुली गावांचा दर्जा मिळावा, वसंतराव नाईक महामंडळाला निधी वाढवून मिळावा. यासह इतर विविध विषयांवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संघटेनेचे श्रावण चव्हाण, रोहिदास राठोड, सी.के.चव्हाण, डॅा.साईदास चव्हाण, चंद्रकांत राठोड आदी उपस्थित होते.