नंदुरबार : जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी कोरोनाबाधित होत असून, तातडीने वैद्यकीय उपचार व आवश्यक ती औषधे उपलब्ध करून देण्याकरिता स्वतंत्र व वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेले कोविड रुग्णालय असावे, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमत देवकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे. अशा जागतिक महामारीच्या काळात जिल्ह्यात कार्यरत असलेले सर्व शासकीय कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षेसाठी, तसेच बाधित व्यक्तींना कोरोना आजारातून मुक्त करण्यासाठी अविरतपणे आपले कर्तव्य बजावीत आहेत. मार्च २०२० पेक्षा मार्च २०२१ मध्ये झालेला कोरोनाचा उद्रेक व प्रार्दुभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे, तसेच जिल्ह्यातील मृत्यू दरदेखील तुलनात्मकदृष्ट्या वाढलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोना महामारीविरुद्ध कर्तव्य बजावणारे विविध विभागांतील शासकीय कर्मचारी एकापाठोपाठ एक याप्रमाणे संक्रमित होत आहेत. त्यातील बहुतांश कर्मचारी हे आजाराच्या गंभीर स्थितीतदेखील पोहोचत आहेत. सद्य:स्थितीत शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांतदेखील बेडस् उपलब्ध नाहीत. त्यामुळे वैद्यकीय उपचारांकरिता बाधित शासकीय कर्मचाऱ्यांना नजीकच्या राज्यात वैद्यकीय उपचाराकरिता जावे लागत आहे. त्यामुळे अशा स्थितीत बाधित रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब होत असून, प्रसंगी वैद्यकीय उपचारांअभावी रुग्ण दगावण्याच्या घटनादेखील घडत आहेत. जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या स्फोटक परिस्थितीला दररोज सामोरे जात असताना जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत, त्यामुळे त्यांना, तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना तातडीने वैद्यकीय उपचार व आवश्यक ती औषधी उपलब्ध करून देण्याकरिता स्वतंत्र व वैद्यकीय सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले कोविड रुग्णालय असणे ही सध्याच्या काळाची नितांत गरज बनलेली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता जनतेला अखंड सेवा देण्याकरिता कोरोना योद्धे म्हणून काम करीत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र कोविड रुग्णालय तयार करण्यात यावे, अशी मागणी अध्यक्ष डॉ. हेमंत देवकर, सरचिटणीस सुभाष महिरे, हेमंत मरसाळे, भरत शिंदे, मदन मोरे, ओम कुलकर्णी, दिनेश रणदिवे आदींनी केली आहे.