समितीचे सदस्य भरत गावित, सी.के.पाडवी, विजय पराडके, हिराबाई पाडवी, देवमन पवार उपस्थित होते. सभेत चांदसैली आरोग्य उपकेंद्रात कर्मचारीच रहात नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली. सदस्यांच्या मागणीनुसार जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेंद्र चव्हाण यांना कारवाईच्या सूचना केल्या आहेत. सभेत जिल्हा ग्रामविकास निधी कार्यक्रमांतर्गत दिलेल्या कर्जाची वसुली झाली पाहिजे व त्यांतर्गत ग्रामपंचायतीने बांधलेले व्यापारी गाळे वापर करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना द्याव्यात, अशी मागणी सदस्य विजय पराडके व देवमन पवार यांनी केली. नवापूर पंचायत समितीच्या जागेचा सातबारा नावावर घेण्यासाठी प्रयत्न करावा अशी सूचना भरत गावित यांनी केली. डेब्रामाळ व बर्डी पाणीपुरवठा योजनेच्या कामांची चाैकशी होत नसल्याचे सी.के.पाडवी यांनी सांगितले. अतिदुर्गम भागात अधिकाऱ्यांना नेऊन पाहणी करावी तसेच रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करावेत, यातून आदिवासी बांधवांना आरोग्याच्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा सदस्य भरत गावित यांनी व्यक्त केली.
सभेत जिल्हा परिषदेच्या वार्षिक प्रशासन अहवाल छपाई खर्चास स्थायी समितीची मान्यता मिळणे, शहादा तालुक्यातील फत्तेपूर, शिरुड, चिखली रस्त्यावर संरक्षण भिंत बांधण्यासाठी ४४ लाख व वडछील ते मोहिदे रस्ता डांबरीकरणासाठी ४४ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. शहादा तालुक्यातील गोगापूर ते कोचरा रस्त्यासाठी ४३ लाख रूपये, शहादा तालुक्यातील उनपदेव रस्ता सुधारणा करण्यासाठी ४४ लाख यासह जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी निविदा मंजूर करण्यात आली.
जिल्हा परिषेदला जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या १८९ कोटी ८३ लाख रुपयांच्या नियतव्ययाबाबत सभेत चर्चा करण्यात आली. प्राप्त झालेला निधी कोणत्या विभागासाठी कसा खर्च करण्यात यावा याबाबत सभेत चर्चा करण्यात आली.